“तिळवणीच्या बाजारात प्रत्येक सोमवारी घडतंय… पण कोणी बोलत नाही!”

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील तिळवणी गावामध्ये सोमवारी भरणारा तिळवणीचा आठवडा बाजार परिसरातील ग्रामीण अर्थकारणाचा महत्त्वाचा आधार आहे. रूई, साजणीसह आसपासच्या अनेक गावांतील नागरिक व व्यापारी येथे येतात. मात्र एवढ्या मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची मोठी गैरसोय होत आहे.
लक्ष्मी इंडस्ट्रीज मधून येणारा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात बाजाराला येतो. बाहेरगावातून येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक व व्यापाऱ्यांना स्वच्छतागृहाअभावी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. महिलांना तर अत्यंत अवमानकारक परिस्थितीला तोंड द्यावे लागते. गावाला आर्थिक उलाढाल देणाऱ्या या बाजाराकडे ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
ग्रामपंचायत व्यापाऱ्यांकडून सामान्य पावतीद्वारे शुल्क आकारते. मात्र त्या बदल्यात मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः महिलांना स्वच्छतागृहाअभावी कुचंबणा सहन करावी लागते. अनेकजणी केवळ या कारणामुळे बाजारात जास्त वेळ थांबू शकत नाहीत.
गावात उरूस, सण–समारंभ किंवा लग्नकार्याच्या निमित्ताने बाहेरगावचे पाहुणे मोठ्या संख्येने येतात. अशा वेळी स्वच्छतागृहाची सोय नसल्याने पाहुण्यांसह ग्रामस्थांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. गावाच्या प्रतिमेवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या सुविधेची मागणी होत असताना ग्रामपंचायतीकडून “जागा उपलब्ध नाही” हेच उत्तर दिले जात आहे. मात्र योग्य नियोजन व इच्छाशक्ती असल्यास पर्यायी जागा किंवा तात्पुरती व्यवस्था उभी करणे शक्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून “जागा नाही” हेच कारण पुढे करून प्रशासन जबाबदारी झटकत आहे. प्रत्यक्षात गावात इतर कामांसाठी जागा उपलब्ध होते, मग सार्वजनिक स्वच्छतागृहासाठीच अडचण का? असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे.
“जागा नाही” हे उत्तर आता नागरिक स्वीकारायला तयार नाहीत. जागा शोधणे, पर्यायी व्यवस्था उभी करणे हे प्रशासनाचे काम आहे. सुविधा देता येत नसतील तर पावती वसुली बंद करा, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
बाहेरगावाहून येणारे व्यापारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाजारात थांबतात. मुतारीची सोय नसल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. काही विक्रेत्यांनी या गैरसोयीमुळे तिळवणी बाजाराऐवजी इतर ठिकाणी जाण्याचा विचार सुरू केल्याचे बोलले जात आहे. यामुळे बाजाराच्या उलाढालीवर परिणाम होण्याची भीती आहे.
नागरिकांच्या मते, बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग स्वच्छतागृह व स्वच्छतेसाठी खर्च करणे गरजेचे आहे. फिरते स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय किंवा एखाद्या सार्वजनिक इमारतीचा वापर असे तात्पुरते उपाय तरी तातडीने करावेत, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना तिळवणी गावातील स्वच्छतागृहांचा मूलभूत प्रश्न मात्र अजूनही जैसे थे आहे.उमेदवार विकासाच्या गप्पा मारत असताना किमान स्वच्छतागृहासारखी सुविधा देऊ शकत नसतील तर मतदान मागण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का, असा संतप्त सवाल महिलावर्गातून उपस्थित होत आहे.
तिळवणी बाजार ही गावाची ओळख आहे. उरूस, सण, आठवडा बाजार यावेळी बाहेरून येणाऱ्या लोकांना सन्मानाची व सुरक्षित सुविधा देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. प्रशासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.



