मंदिरातील मूर्ती व दागिने चोरणारे दोघे जेरबंद; सांगली पोलिसांची मोठी कारवाई

सांगली प्रतिनिधी : सांगली पोलिसांनी रविवारी धडाकेबाज कारवाई करत मंदिरातील देवमूर्ती व दागिने चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींनी सांगलीतील एका घरासह शिरोळ व रत्नागिरी येथील मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी माहिती दिली की, तपास पथकातील कर्मचारी हणमंत लोहार, मस्के, अभिजीत ठाणेकर व ऋतुराज होळकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. दोन संशयित इसम चोरीचे भांडी व सोन्याचे दागिने विक्रीसाठी मोटारसायकलवरून फल्ले मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे सापळा रचला.
सापळ्यादरम्यान दोन इसम प्लॅटिना मोटारसायकलवर येऊन थांबले. त्यांच्या जवळील गोणपाट संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले.
अटक केलेले आरोपी
अक्षय अर्जुन मोरे (वय २८, रा. गोंदिलवाडी, आमणापूर, ता. पलूस)
संभाजी राजाराम जाधव (वय ३०, रा. विकास कारखाना, पलूस)
झडतीत अक्षय मोरे याच्या खिशात सोन्याचे मंगळसूत्र व चार पदरी हार आढळला. गोणपाटात
४२ किलो ५८९ ग्रॅम चांदीचे दागिने व लक्ष्मीची मूर्ती,
१२ किलो ८०० ग्रॅम वजनाची पंचधातूची गणेश मूर्ती,
३ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र,
एक दुचाकी
असा एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
आरोपींची कबुली
चौकशीत दोघांनी २० दिवसांपूर्वी सांगलीतील राममंदिर चौकाजवळील बंद घरात, तसेच महिनाभरापूर्वी शिरोळ व रत्नागिरीतील मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्यांनी सोन्या–चांदीचे दागिने, चांदीची भांडी, पितळ व तांब्याची भांडी चोरल्याचे स्पष्ट झाले.
दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वीही त्यांच्यावर मंदिर चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सांगली पोलीस करीत आहेत.





