जनतेच्या विश्वासावर विकासाचा पाया भक्कम करणार : प्रमोद कदम

(तिळवणी -प्रतिनिधी)
जनतेची सेवा करणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे हेच आपले जीवनधर्म असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद निवडणूक मतदारसंघातील उमेदवार प्रमोद कदम यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन तिळवणी समोर येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सरपंच राजेश पाटील यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच महादेव कोळी, माजी उप सरपंच ग्रा. सदस्य सुकुमार चव्हाण , उपसरपंच दिपक गायकवाड, निवास कोळी, सिंधुताई माने, निता चव्हाण,अरूणा कुंभार, तंटामुक्त अध्यक्ष सुंदर माने, ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमोद कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक क्षेत्रात सातत्याने काम करत आलो आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सक्षम करणे, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण या मूलभूत बाबींना प्राधान्य देणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच महिलांच्या स्वावलंबनासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“जनतेचा विश्वास आणि प्रेम हीच माझी खरी ताकद आहे. या विश्वासावरच विकासाचा भक्कम पाया उभा करणार असून, कोणत्याही परिस्थितीत जनतेपासून दूर जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. मतदारसंघातील प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत पोहोचून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
सरपंच राजेश पाटील, माजी सरपंच शकुंतला चव्हाण, माजी गटविकास अधिकारी सुभाष माने, माजी पोलीस पाटील दादासो गायकवाड, प्रा. प्रकाश माने, चंद्रकांत चौगुले, बाबुराव जाधव, गजानन चव्हाण, राजेंद्र पवार आदींनी यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत प्रमोद कदम यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा. रविराज कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल रणदिवे यांनी केले.
या कार्यक्रमास पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक व संस्थांचे प्रतिनिधी, युवक कार्यकर्ते तसेच महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होत्या. उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



