
कोल्हापूर : शहरात सहावीत शिकणाऱ्या १३ वर्षीय परप्रांतीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी लक्षतीर्थ वसाहत येथील प्रेम सचिन हेगडे (वय २२) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री अटक केली. न्यायालयाने आरोपीस २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे लक्षतीर्थ वसाहत परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संशयिताला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती.
पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. व्यसनाधीन व बेरोजगार असलेल्या हेगडेने पीडितेच्या कुटुंबाशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत गुरुवारी (दि. ८) मुलीला दुचाकीवरून शिंगणापूर परिसरातील शेतात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर शनिवारी (दि. १७) दुपारी उजळाईवाडीजवळील मणेर मळा भागातील झाडीत पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
घटनेबाबत कुठे वाच्यता केल्यास तुझ्यासह आई–वडिलांना जीवे मारू, अशी धमकी आरोपीने दिल्याने मुलगी प्रचंड घाबरली होती. अखेर तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांनाही धमकावून दहशत निर्माण केली.
ही माहिती परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी संतप्त होऊन आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो हाती लागला नाही. शनिवारी रात्री नागरिकांनी मोठ्या संख्येने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यावर धाव घेत अटकेची मागणी केली. जमाव वाढल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, पोलिस उपअधीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. खबरदारी म्हणून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
वरिष्ठ अधिकार्यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. मध्यरात्री आरोपीला अटक करण्यात आली. शहरातील महिला संघटना, सामाजिक संस्था व विविध संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.




