India police newsराजकीय

महायुतीच्या नेत्यांची पहिली संयुक्त बैठक संपन्न; जागावाटपाच्या फॉर्मुल्यावर प्राथमिक एकमत

कोल्हापूर | प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीच्या जागावाटपाबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पहिली संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत भाजपने 35 ते 40 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांच्यासह आमदार चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, विनय कोरे, अमल महाडिक आदी नेते उपस्थित होते. तसेच जनसुराज्यचे नेते समित कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.
बैठकीत जिल्ह्यातील विद्यमान राजकीय परिस्थिती व संभाव्य उमेदवारांचा आढावा घेण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 68 जागांपैकी शक्य त्या सर्व ठिकाणी महायुती म्हणून एकत्र लढण्यावर भर दिला जाईल. जेथे ते शक्य नसेल, तेथे जास्तीत जास्त घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न राहील. मात्र काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारची युती करायची नाही, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून 35 ते 40 जागांवर लढण्याची तयारी असून कोअर कमिटीकडून 40 जागांची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघातील ताकद व स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावानुसार जागावाटप निश्चित केले जाईल. सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक, करवीरमध्ये आमदार चंद्रदीप नरके, हातकणंगले–इचलकरंजीमध्ये खासदार धैर्यशील माने व आमदार राहुल आवाडे, कागलमध्ये समरजीतसिंह घाटगे, पन्हाळ्यात आमदार विनय कोरे, तर चंदगडमध्ये आमदार शिवाजी पाटील हे नेतृत्व करणार आहेत. या सर्वांना मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर व खासदार धनंजय महाडिक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
जागावाटपाचा अंतिम फॉर्मुला लवकरच जाहीर होणार असून त्यानंतर उमेदवारांवर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे येत्या काळात कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक अधिक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
04:46
📰 “तिळवणीच्या बाजारात प्रत्येक सोमवारी घडतंय… पण कोणी बोलत नाही!” | 📰 “धमकी, दहशत आणि अत्याचार… कोल्हापुरातील रात्रभर चाललेला थरार” | 📰 कोंडिग्रेत बनावट दारू कारखान्यावर छापा; 17 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक | 📰 मंदिरातील मूर्ती व दागिने चोरणारे दोघे जेरबंद; सांगली पोलिसांची मोठी कारवाई | 📰 महायुतीच्या नेत्यांची पहिली संयुक्त बैठक संपन्न; जागावाटपाच्या फॉर्मुल्यावर प्राथमिक एकमत |