
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे येथे सुरू असलेल्या बनावट दारूनिर्मितीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी धडक कारवाई केली. शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या कारखान्यावर छापा टाकून पथकाने 2 लाख 25 हजार रुपये किमतीच्या बनावट दारूने भरलेल्या 375 बाटल्या, तसेच तीन मोटारी असा एकूण 16 लाख 95 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी दत्तात्रय भीमराव बंडगर (49, रा. संजयनगर, सांगली), अवधूत राजेंद्र पिसे (30, रा. दानोळी, ता. शिरोळ) आणि संतोष कुमार कांबळे (30, रा. कोंडिग्रे) या तिघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित बंडगर हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याच्यावर दारू तस्करीचे गुन्हे दाखल आहेत.
गोव्यातून दारू आणून ब्रँडेड बाटल्यांत भेसळ
तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, संशयित हे गोव्यातील म्हापसा येथून कमी किमतीची दारू आणत होते. ती महाराष्ट्रातील नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्यांत भरून, बनावट बूच व सील लावून बाजारात विक्रीसाठी पाठवली जात होती. सुमारे दीड वर्षांपासून हा गैरधंदा राजरोसपणे सुरू असल्याचे समोर आले आहे.
छाप्यात विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या बाटल्या, बनावट सील, भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य मोठ्या प्रमाणात सापडले. अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, कांचन सरगर यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
रॅकेटचे धागेदोरे आणखी खोलवर
या प्रकरणात गोव्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील काही तस्कर सहभागी असल्याचा संशय असून, तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. लवकरच आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचे अधीक्षक नरवणे यांनी सांगितले.




