
ईश्वरपूर प्रतिनिधी : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सुमारे १५ लाख १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिराळा आणि कोल्हापूर येथील चौघांविरुद्ध ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात बाजीराव जोती पाटील (वाडीभाग, ता. शिराळा), गणेश दिनकर जाधव, नागेश दिनकर जाधव आणि मनीषा गणेश जाधव (तिघेही पाचगाव, कोल्हापूर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अर्जुन आण्णासो देशमुख (कापूरवाडी–पेठ, ता. वाळवा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख यांच्या मुलाला कारागृह विभागात वरिष्ठ लिपिक पदावर सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगत आरोपींनी २०२४ दरम्यान देशमुख यांच्याकडून वेळोवेळी आरटीजीएस तसेच रोख स्वरूपात १५ लाख १० हजार रुपये घेतले होते.
काही काळानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर देशमुख यांनी आरोपींकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांना एकूण रकमेपैकी २ लाख रुपये परत मिळाले. मात्र उर्वरित रक्कम न मिळाल्याने आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.




