
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. 16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक
निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे.
समाविष्ट जिल्हे पुढीलप्रमाणे : कोकण विभाग : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे विभाग : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
छत्रपती संभाजीनगर विभाग : छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर
निवडणूक कार्यक्रम (महत्वाच्या तारखा)
जिल्हाधिकारी प्रसिद्धी : 16 जानेवारी
उमेदवारी अर्ज स्वीकारणे : 16 ते 21 जानेवारी
अर्ज छाननी : 22 जानेवारी
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 27 जानेवारी (दुपारी 3 वाजेपर्यंत)
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : 27 जानेवारी (दुपारी 3.30 नंतर)
मतदान : 5 फेब्रुवारी (सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30)
मतमोजणी : 7 फेब्रुवारी (सकाळी 10 वाजल्यापासून)
प्रत्येक मतदाराला दोन मते
या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत. यामध्ये एक मत जिल्हा परिषदेसाठी तर दुसरे मत पंचायत समितीसाठी असेल. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे.
जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य
राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, उमेदवाराने जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा सादर करावा लागेल. मात्र, निवडीनंतर 6 महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवारी रद्द केली जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्हे
ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या जिल्ह्यांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीनुसार 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करणे निवडणूक आयोगासाठी बंधनकारक आहे.
पंचायत समित्यांच्या जागांचा तपशील
एकूण पंचायत समित्या : 125
एकूण जागा : 1,462
महिलांसाठी जागा : 731
अनुसूचित जातींसाठी : 166
अनुसूचित जमातींसाठी : 38
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग : 342
महापालिका निवडणुकांचे मतदान 15 जानेवारी रोजी होत असून निकाल 16 जानेवारीला जाहीर होणार आहेत. त्यानंतर ग्रामीण महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.




